“ती आली , ती लढली, ती जिंकली शेवटी..!” माध्यमांचे चक्रव्यूह आणि रिया चक्रवर्ती..!
“ती आली , ती लढली, ती जिंकली शेवटी..!”
माध्यमांचे चक्रव्यूह आणि रिया चक्रवर्ती..!
जून २०२० मध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. त्याच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या वादळाने अनेक प्रश्न उपस्थित केले, ज्यामध्ये त्याची तत्कालीन मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावर गंभीर आरोपांचा भडीमार झाला. काही माध्यमांनी तिला थेट खुनाच्या कटाचा भाग ठरवत तिच्यावर "मीडिया ट्रायल" घडवून आणली. पण चार वर्षांहून अधिक काळ लढल्यानंतर, २२ मार्च २०२५ रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला. या अहवालात सुशांतची आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले असून, रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला कोणत्याही गुन्ह्यापासून निर्दोष ठरवण्यात आले आहे. हा निकाल म्हणजे रियाच्या मूक आणि संयमी लढाईचा विजय आहे.
एका तरुणीवर लादलेले आरोपांचे ओझे
सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू १४ जून २०२० रोजी त्याच्या मुंबईतील बांद्रा येथील राहत्या घरी झाला. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे नोंदवले. पण सुशांतचे वडील के.के. सिंग यांनी पाटण्यात रिया आणि तिच्या कुटुंबाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, आर्थिक गैरव्यवहार आणि मानसिक छळाचे आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. त्याचवेळी, काही माध्यमांनी रियाला खलनायक ठरवत तिच्यावर खुनाचा आणि ड्रग्ज प्रकरणाचा ठपका ठेवला. या सनसनाटी बातम्यांनी तिची प्रतिमा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तिला "विच हंट" चा बळी बनवण्यात आले, ज्यामुळे ती आणि तिचे कुटुंब संपूर्ण देशाच्या रोषाला बळी पडले.
रियाला सप्टेंबर २०२० मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ड्रग्ज प्रकरणात अटक केली. तिने २७ दिवस तुरुंगात घालवले. तिच्यासोबत तिचा भाऊ शोविकलाही अटक झाली होती. विशेष म्हणजे, रियाचे वडील लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती (निवृत्त) हे भारतीय सैन्यात अधिकारी होते. तरीही रियाने किंवा तिच्या कुटुंबाने कधीही देशभक्तीच्या नावाखाली सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. तिने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा आक्रस्ताळेपणा दाखवला नाही किंवा सोशल मीडियावरून भावनिक आवाहन केले नाही. ती शांत राहिली, कायद्यावर विश्वास ठेवला आणि आपली लढाई लढत राहिली.
सीबीआयचा अहवाल: सत्याचा विजय
सीबीआयने सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूत कोणताही फाऊल प्ले किंवा बळजबरीचा पुरावा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये एम्सच्या फॉरेन्सिक टीमनेही सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या असल्याचे निश्चित केले होते. त्यात "विषबाधा" किंवा "गळा दाबून खून" अशा दाव्यांचे खंडन करण्यात आले होते. सीबीआयने रिया, तिचे पालक आणि भाऊ यांच्यावरील सर्व आरोपांचे खंडन करत त्यांना निर्दोष ठरवले. हा अहवाल आता मुंबई आणि पाटणा येथील विशेष न्यायालयात सादर करण्यात आला असून, न्यायालय या अहवालाला मान्यता देणार की पुढील तपासाचे आदेश देणार, हे पाहणे बाकी आहे.
रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी या निकालाचे स्वागत केले. त्यांनी म्हटले, "रियाला कोणत्याही चुकीशिवाय २७ दिवस तुरुंगात काढावे लागले. तिच्या आणि तिच्या कुटुंबाने हे अमानवीय वर्तन सहन केले, तरीही ते शांत राहिले. आम्ही सीबीआयचे आभारी आहोत की त्यांनी हे प्रकरण सर्व बाजूंनी तपासून बंद केले." त्यांनी माध्यमांवरही टीका केली की, "सोशल मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर पसरलेल्या खोट्या कथनांमुळे निष्पाप लोकांना त्रास सहन करावा लागला."
माध्यमांची जबाबदारी आणि माफीचा प्रश्न
सुशांतच्या मृत्यूनंतर काही माध्यमांनी या प्रकरणाला सनसनाटी बनवले. तथ्यांऐवजी भावनिक आवाहन आणि षड्यंत्राच्या थिअरींना हवा दिली गेली. रियाला खलनायक ठरवून तिचे चारित्र्यहनन करण्यात आले. "ती सुशांतला ड्रग्ज देत होती", "ती त्याला मानसिक त्रास देत होती", "ती खुनात सामील होती" असे आरोप बिनबुडाचे ठरले. आता सीबीआयच्या अहवालाने हे सर्व दावे खोटे ठरवले आहेत. मग प्रश्न उरतो की, ज्या माध्यमांनी रियाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, ते आता तिची माफी मागणार का?
या प्रकरणातून माध्यमांची जबाबदारी आणि नैतिकता यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अभिनेत्री दिया मिर्झा यांनी सोशल मीडियावर लिहिले, "माध्यमांनी रियावर केलेली ही विच हंट होती. त्यांनी तिचा छळ केला, तिला त्रास दिला, आणि हे सर्व टीआरपीसाठी. आता त्यांनी तिची माफी मागावी, हे त्यांचे किमान कर्तव्य आहे." ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांनीही रियाच्या सहनशीलतेचे कौतुक केले आणि तिला या त्रासातून सावरण्यासाठी वेळ आणि जागा देण्याचे आवाहन केले.
रियाची मूक शक्ती आणि पुढचा प्रवास
रिया चक्रवर्ती ही एक अभिनेत्री आहे, पण या प्रकरणाने तिचे करिअर आणि वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिने हळूहळू स्वतःला सावरले. तिच्या वडिलांचा सैनिकी पार्श्वभूमी असूनही तिने कधीही त्याचा बडेजाव केला नाही. तिने कायदेशीर लढाई निवडली आणि शांतपणे आपली बाजू सिद्ध केली. सीबीआयच्या अहवालानंतर ती आणि तिचे कुटुंब मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले, जिथे तिने प्रसारमाध्यमांना शांतपणे सामोरे जाऊन आपली आस्था व्यक्त केली.
या प्रकरणाने समाजाला एक धडा दिला आहे - तथ्यांशिवाय कोणावरही आरोप करणे आणि त्याला "गिल्टी अँटिल प्रूव्हन इनोसंट" ठरवणे चुकीचे आहे. रियाने आपली प्रामाणिकता सिद्ध केली. ती आली, ती लढली आणि ती जिंकली. आता ती त्या सर्वांना माफ करेल का, हा प्रश्न तिच्या उदार मनावर अवलंबून आहे. पण एक गोष्ट नक्की, तिची ही लढाई भारतीय कायदा आणि सत्यावरचा विश्वास दृढ करते.
विक्रम अरने.
पुणे
vikramarne@outlook.com
Comments
Post a Comment