चहा की कॉफी....?

चहा की कॉफी?





" चहा की कॉफी ? "असा सर्वसाधारण नेहमी विचारला जाणारा प्रश्न . काहींना चहा प्रिय तर काहींची प्रेयसी कॉफी . चहा हा कधीही व कसाही घेतला जाणारा तर कॉफी म्हणजे खास, ती धुसमुसळपणा , घाई अशा प्रकारात अजिबात घेतली जाणारी नाही . कॉफीसाठी विशेष अशी मैफल बनवावी लागते , तिची खास फर्माईश करावी लागते आणि समोर पाहत आसपासचे वातावरण व  रूप-रंग पाहत कॉफीचा गंध हा श्वासात भिनवला जातो  ; मग अलगद तिला अर्धवट ओठांना लावले जाते नकळत जिभेने त्या ओठांवरच्या अर्धवट कॉफीची चव घेतली जाते आणि मग पसंतीची मोहोर उमटली की मग हळूहळू कॉफीचे घोट घेतले जातात .
चहा मात्र सहज चालता चालता तर कधी वन बाय टू , कटींग अशा तऱ्हेने घेण्याची मजा काही निराळीच किंवा औरच परंतु कॉफीला असले शेअरिंग मात्र कधी मान्य नसते ; तसेच तिला जर वन बाय टू असे जरी विभागले तर मग ती रुसून बसते ,ती लगेच थंड होते  . तिची त्यावेळेची चव म्हणजे कोमट पाण्याच्या दोन घोटांपेक्षा काही वेगळी नसते . असा तर तिचा रुसवा .
चहाला कोणाचीही साथ चालते , परंतु कॉफी मात्र स्पेशल असते आणि कॉफ़ीसाठी असलेली वेळही राखीव आणि निवांत असावी लागते . चहा चवीने गोड तर कॉफी मात्र कडू... थोडीशी रुसलेली अशी असते. 
चहा बरोबर गप्पा रंगतात तर कॉफीच्या वातावरणात मनातले भावना तरंगतात .
चहा सभोवतालचा नीरव शांततेत ही गोंधळ घालणारा , तर कॉफी मात्र त्या सर्व गोंधळातही निवांतपणा साधणारी . चहा एखाद्या मुलासारखा,  आवाज यायचा अवकाश की हा एकदम रेडी तयार असणारा . कॉफीचे मात्र तसे नाही ती मुलीसारखी... नखरे करणारी , तोरा मिरवणारी तयार व्हायला वेळ घेणारी.  ती पहिल्यांदा नटणार , थटनार आणि मगच आपल्याला खूप वेळ वाट पाहायला लावून भेटायला समोर येणार.
चहा नेहमीच आवाक्यात तर कॉफी मात्र विचारांच्या पलीकडे .
चहा नदीसारखा झुळझुळ वाहणारा अगदी नजरेच्या टप्प्यात  ; कॉफी मात्र गूढ अथांग समुद्रासारखी थांगपत्ता लागू देणारी .
गडद चहा मनाला तजेला देणारा तर कडक कॉफी आत्मविश्वास जागवणारी .
चहा संपेपर्यंत  ,कप उलटा करून तर कधी बशीत ओतून पिला जाणारा तर कॉफी उरेपर्यंत तिचा आस्वाद घेतला जाणारा .
चहा म्हणजे गीत तर कॉफी म्हणजे संगीत...
चहा म्हणजे सभा , कॉफी म्हणजे मैफिल .
चहा म्हणजे गडबड घाई आणि कॉफी म्हणजे निवांत क्षण थोडक्यात चहा म्हणजे त्याच्यासारखा अल्लड तर कॉफी म्हणजे तिच्यासारखी गुणी ....
-विक्रम अरने.

Comments

  1. Its like getting something unrevealed..
    Feeling awesome after reading it..

    ReplyDelete
  2. Its like getting something unrevealed..
    Feeling awesome after reading it..

    ReplyDelete
  3. Yeah .. The difference I felt in between Tea and Coffee. I hope you are agree with the narration ....

    ReplyDelete
  4. Absolutely..
    It happened with all of us and these words gives that feeling.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog