Posts

Showing posts from April, 2019

चहा की कॉफी....?

Image
चहा की कॉफी ? " चहा की कॉफी ? "असा सर्वसाधारण नेहमी विचारला जाणारा प्रश्न . काहींना चहा प्रिय तर काहींची प्रेयसी कॉफी . चहा हा कधीही व कसाही घेतला जाणारा तर कॉफी म्हणजे खास, ती धुसमुसळपणा , घाई अशा प्रकारात अजिबात घेतली जाणारी नाही . कॉफीसाठी विशेष अशी मैफल बनवावी लागते , तिची खास फर्माईश करावी लागते आणि समोर पाहत आसपासचे वातावरण व  रूप-रंग पाहत कॉफीचा गंध हा श्वासात भिनवला जातो  ; मग अलगद तिला अर्धवट ओठांना लावले जाते नकळत जिभेने त्या ओठांवरच्या अर्धवट कॉफीची चव घेतली जाते आणि मग पसंतीची मोहोर उमटली की मग हळूहळू कॉफीचे घोट घेतले जातात . चहा मात्र सहज चालता चालता तर कधी वन बाय टू , कटींग अशा तऱ्हेने घेण्याची मजा काही निराळीच किंवा औरच परंतु कॉफीला असले शेअरिंग मात्र कधी मान्य नसते ; तसेच तिला जर वन बाय टू असे जरी विभागले तर मग ती रुसून बसते ,ती लगेच थंड होते  . तिची त्यावेळेची चव म्हणजे कोमट पाण्याच्या दोन घोटांपेक्षा काही वेगळी नसते . असा तर तिचा रुसवा . चहाला कोणाचीही साथ चालते , परंतु कॉफी मात्र स्पेशल असते आणि कॉफ़ीसाठी असलेली वेळही राखीव आणि निवांत असावी लागते .