" कोविड १९ -विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि पालकांची आर्थिक स्थिती . "


" कोविड १९ -विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि पालकांची आर्थिक स्थिती . "


             

भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा वाढणारा आकडा पाहून मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही साथ आटोक्यात आली नाही तर लॉक डाऊन ३१ मे नंतर ही वाढविण्याची शक्यता वर्तविली .

सध्या महाराष्ट्रामध्ये अंतिम पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात की घेण्यात येऊ नये असा एक वादाचा प्रसंग सुरु आहे . या विषयावर सविस्तरपणे लिहिण्याआधी या वादाची संपूर्ण पार्श्वभूमी समजावून घेणे गरजेचे आहे . 
डिसेंबरपासून २०१९ पासून चीनमध्ये कोरोना विषाणूने कशाप्रकारे थैमान घातले आहे या विषयीच्या बातम्यांचे प्रसारण सर्वत्र सुरु होते. व्हाट्स एप्प व इतर सोशल माध्यमातून येणाऱ्या विविध बातम्या व व्हिडिओज वरून आपण येथे भारतात बसून त्याविषयी चर्चा करत बसायचो. त्यावेळच्या काही बोलक्या आणि प्रचलित तथाकथित प्रतिक्रिया-

१. आपला भारत हा भौगोलिकदृष्ट्या उष्णकटिबंधात येत असल्याने येथील वातावरणात कोविड १९ विषाणूचा टिकाव लागणे शक्यच नाही.

२. भारतातील लोकांची प्रवृत्ती आणि सवयी पाहता सर्वत्र एकाचवेळी लॉक डाऊन करता येणार नाही.

३. भारतीयांची रोगप्रतिकारक क्षमता ही इतर कोणत्याही देशातील नागरिकांपेक्षा जास्त आहे म्हणून भारतीयांवर कोरोना विषाणूंचा एवढा काही परिणाम होणार नाही.

अशा कित्येक प्रतिक्रिया आपण सामान्यतः नेहमीच ऐकत आलेलो आहोत. आणि आज आपली रोजची परिस्थिती पाहता आपण खरेच किती गांभीर्याने (?) या कोरोना परिस्थितीकडे पाहत होतो याची जाणीव होते. 
कारण भारतात ३० जानेवारी २०२० रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण केरळ राज्यात सापडला आणि आज रोजी भारतात एकूण १,३८,८४५ इतके कोरोनाबाधित रुग्ण आहेत . म्हणजेच महिना सरासरी ४०,००० म्हणजेच दिवसाला सरासरी २१५३ एवढे रुग्ण सापडत आहेत .  आणि एकवेळ सर्वाधिक रुग्णसंख्या असणारे केरळ राज्य आता पूर्णतः नियंत्रणात आले असून महाराष्ट्रात मात्र दररोज हजारांच्या पटीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे .

आता आपण आपल्या आधीच्या मूळ विषयाकडे वळूयात .

पहिल्या लॉक डाऊनच्या विस्ताराची घोषणा करताना मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला भावनिक आवाहन केले की केवळ २१ दिवस आपण घरातच बसून कोरोनाला हरवू शकतो आपण सर्वांनी घरातच बसून राहावे आणि प्रशासनाला लॉक डाऊनच्या काळात बाहेर न पडता सहकार्य करावे. ( आणि असेही एक भावनिक आव्हान केले की हे येणारे २१ दिवस जर आपण स्वयंशिस्तीने आणि काटेकोरपणे घरातच राहून स्वतःवर नियंत्रण ठेवले तर आपण कोरोनाला सहज हरवू शकतो नाहीतर आपण आपल्या देशाला , आपल्या अर्थव्यवस्थेला आणखी २१ वर्षे  मागे लोटण्यास कारणीभूत ठरू. असो . आज त्याच २१ दिवसांच्या लॉक डाऊनचे ७० व्या दिवसांचे पर्व सुरु आहे . मागेही असेच एकदा मा पंतपप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना ५० दिवसात अर्थव्यवस्था ही पुन्हा रुळावर येईन असे सांगितले होते . सध्या त्या अर्थव्यवस्थेचा मूळचा रूळ कोणता हेच कळलेले नाही . नुकतीच एक बातमी होती की मुंबईवरून मजुरांना घेऊन गोरखपूर, उत्तरप्रदेश कडे रवाना झालेली श्रमिक एक्सप्रेस ओडिशा ला पोहचली . असा तर आपला कारभार ). 

या लॉक डाऊन च्या वेळी त्यांनी देशवासियांना असेही सांगितले होते की सर्वानी घरीच बसावे , शेवटी "जान है तो जहाँ है .... "

आता १५ एप्रिलला दुसरा लॉक डाऊन संपला तेव्हा मा पंतप्रधानांनी आपल्या पहिल्या घोषणेत थोडासा बदल केला आणि जनतेला पुन्हा एकदा भावनिक आवाहन केले , "मित्र हो .... काटेकोरपणे लॉक डाऊन पाळा , सर्वांनी घरीच बसा , कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांना सहकार्य करा शेवटी ..... जान ही जहाँ है …"

त्यांनी कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशवासियांना घराच्या गॅलरी , खिडक्या  दारांत येऊन थाळी वाजवून किंवा कधी रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी दिवे लावून प्रोत्साहन देण्याचे आव्हान ही केले . लोकांनीही ते किती गांभीर्याने घेतले हे आपण जाणतोच .


तर काही दिवसांपूर्वी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेविषयी बऱ्याच संभ्रमाच्या अवस्था होत्या. आम्हा प्राध्यापक मंडळींनाही विद्यार्थ्यांच्या शंकाकुशंकांना कशा प्रकारे उत्तरे द्यावीत हे समजत नसायचे . कारण एखादी सूचना प्राप्त झाली की ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यापूर्वीच त्यात काही बदल झालेले असायचे. नुसता गोंधळ आणि अफवांचा बाजारच.  ही सर्व शिक्षण संस्था , शैक्षणिक तज्ञ यांची अशी अवस्था होती तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचे काय होत असेल याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास ही विद्यार्थ्यांची मानसिकता किती गंभीर आहे याची कल्पनाच केलेली बरे ..

पुन्हा एक अंतिम निर्णय (निदान आतापर्यंत तरी) जाहीर झालेला आहे की , पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षातील आणि प्रथम वर्ष पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांच्या सरासरी मागील  परीक्षांतील गुणांचा विचार करून परीक्षा न घेता पुढील वर्गात दाखल करून घ्यावे . तसेच अंतिम वर्षातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा मात्र काही विशेष बदल करून घेण्यात येतील. याच वेळी यु जी सी ने ही शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कॅलेंडर जाहीर केले . त्यावेळी देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा होता २३,७८९ आणि आज हा लेख लिहीत असताना देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आहे १,३८,९७२ .

आणि अशातच महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचा वाढत जाणारा प्रादुर्भाव पाहता राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी यु जी सी ला १७ मे ला एक पत्र लिहिले आणि त्यात असे लिहिले की  महाराष्ट्रातील कोरोनाची सध्याची भयंकर परिस्थिती पाहता अंतिम वर्षात शिकणाऱ्या जवळ पास आठ-नऊ लाखांवर असणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पळून घेता येणे सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी अशक्यप्राय अशी गोष्ट आहे . तरी आपण पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षातील आणि प्रथम वर्ष पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ज्याप्रकारे न घेण्याचा निर्णय घेतला तसाच निर्णय हा अंतिम वर्षातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही घ्यावा . अर्थातच मंत्री महोदयांनी केवळ हे असे निवेदन किंवा विनंतीपत्र यु जी सी ला लिहिले होते तो काय अंतिम निर्णय नव्हता किंवा परीक्षा होणार नाहीतच असेही काही जाहीर केले नव्हते तरी त्यांच्या या पत्राचा नीट अभ्यास न करता माध्यमांनी बोभाटा केलाच आणि ब्रेकिंग न्युज की शिक्षण मंत्र्यांचा निर्णय , सर्व परीक्षा रद्द (?). आणि सर्व परीक्षा रद्द असे सर्वत्र विद्यार्थी आणि पालक वर्गात अफवांचे पीक आले .

अर्थातच शिक्षण मंत्र्यांच्या या मागणीचे विद्यार्थी वर्गांकडून मोठया प्रमाणावर स्वागतही करण्यात आले. काही शिक्षण क्षेत्रातील आजी माजी तज्ञ , मान्यवर आणि काही राजकीय विद्यार्थी संघटनांनी काय राज्य सरकार परीक्षा घेऊ शकत नाही का ? सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची  चिंता नाही का ? अशा विविध शंका , टिकांचा भडीमार सुरु केला . आता आधी आपण या टिका , आक्षेप काय आहेत यांचा विचार करूयात आणि त्यांचे म्हणणे काय आहे ते ही पाहुयात .

१. अशा प्रकारे परीक्षा न घेताच खैरातीत पदवी मिळाल्याने बेरोजगारांची फौजच निर्माण होईल.

२. अशा विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यास अडथळे येतील

३. हुशार/मेरीटच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.

४. या विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा देता येणार नाहीत .

५. इत्यादी ..

आता सर्व आक्षेप आणि एक प्राध्यापक म्हणून मला काय वाटते हे ही मला सविस्तरपणे मांडावेसे वाटते .

१. महाराष्ट्रात सर्व शैक्षणिक संस्था या १६ मार्च २०२० पासून ते आजपर्यंत म्हणजे जवळ जवळ ७० दिवस झाले बंद आहेत. आणि जर हा लॉक डाऊन किंवा कोरोनाची स्थिती नसली असती तर याच कालावधीमध्ये या सर्व परीक्षा होऊन निकालाची तयारी होणे अपेक्षित होते.

२. बरेच विद्यार्थी पहिल्या लॉक डाउनच्या कालावधीत अभ्यास करतच होते कारण २१ दिवसात ही सर्व आपत्कालीन परिस्थिती आटोक्यात येणारच असा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्यात होता . परंतु जसा जसा आधी ३० एप्रिल पहिला टप्पा , मग १४ एप्रिल दुसरा टप्पा , पुन्हा ०३ मे तिसरा टप्पा , पुढे १७ मे हा पुढील टप्पा ते आता ३१ मे चा अंतिम (?) टप्पा असे लॉक डाऊनचे कालावधीचे टप्पे वाढतच गेले आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची मानसिकता डळमळीत व्हायला लागली आणि परीक्षांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये शंका कुशंकांचे माहूर माजू लागले .

३. एकीकडे काही लोक असेही म्हणताना आढळले की उलट या काळात विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा तिप्पट कालावधी मिळाला आहे अभ्यासाची आणि परीक्षेची तयारी करायला.

आता वरील सर्वांचा सांगोपांग विचार करून एक सिद्धांत मांडूयात " कोविड १९ -विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि पालकांची आर्थिक स्थिती . " कोविड १९ च्या काळात सर्वानी आपले मानसिक आरोग्य कसे जपावे तसेच आपण सर्वांनीं  भविष्याचा विचार करून आपल्या उत्पन्नाचे नियोजन कशा प्रकारे करावे या विषयांवर बऱ्याच वेबिनार ला मी ऑनलाईनच्या माध्यमातून प्रत्यक्ष , अप्रत्यक्षरीत्या सहभागही नोंदविला परंतु मी जो विषय म्हणत आहे ' कोविड १९ -विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि पालकांची आर्थिक स्थिती' याविषयी मात्र एकत्रितपणे आपले मत कोणीच मांडलेले मला जाणवले नाही म्हणून हे मत नोंदविणे किंवा हा विषय आपण सर्वांसमोर मांडणे मला जास्त संयुक्तिक वाटते.

४. बऱ्याचशा मध्यमवर्गीय आणि खाजगी क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या नोकरदार पालकांना मार्च महिन्यात पूर्ण वेतन मिळाले . रोजंदारी आणि हातावरचे पोट असणाऱ्या पालकांना मात्र ते ही नाही मिळाले . काही नोकरदार पालकांना घरून काम करण्याची मुभा मिळाली अर्थातच असे आजच्या महाविद्यालयीन वर्गात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांचे प्रमाण खूपच कमी आहे हे वास्तवही स्वीकारले पाहिजे . गोरगरीब, दिवसभर काबाडकष्ट केले तरच रात्री जेवायला मिळणार अशा पालकांना मात्र सक्तीचा लॉक डाऊन अनुभववा लागला . आता अशा कष्टकरी पालकांच्या मुलांचा आपणांस प्रामुख्याने विचार करावा लागेल . त्यांना अभ्यास  करायला खूप कालावधी मिळाला असे आपण एक वेळ म्हणूयात पण एकीकडे रोजगार बुडाल्यामुळे , घरातील अन्नधान्याचा साठा संपत आला असताना कोणत्या मानसिकतेने विद्यार्थीवर्ग अभ्यास करू शकणार होता ? आपल्या पालकांचे दररोज काळजी आणि चिंतेने ग्रासलेले चेहरे पाहून त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा कोणीही विचारच केलेला दिसत नाही . आपण घरच्या घरीच थांबावे असेही म्हणतो परंतु आपण सर्वांना माहितीच आहे की आजही देशातील अधिक्याने लोक हे अतिशय दाटीवाटीच्या वस्त्यांत , चाळींमध्ये राहतात . एका छोट्याशा घरामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसे राहतात , आणि सर्व घरी असले की मग दाटी अडचणी निर्माण होतात त्यामुळे बरेचसे लोक दिवसभर घराच्या बाहेर असतात आणि रात्री फक्त झोपण्यासाठी घराचा आसरा घेतात परंतु आता लॉक डाऊन असल्याने नाईलाजास्तव छोट्याशा घरात सर्व राहत असल्याने जिथे बसायला जागा नाही नीट , तिथे विद्यार्थ्यांनी कोणत्या मानसिकतेने अभ्यास करणे अपेक्षित आहे ? आपण असेही म्हणतो की "आधी पोटोबा मग विठोबा" जर पोटातील आग जर शांत होणार नसेल तर ज्ञानाच्या दिव्याला कसे तेवत ठेवता येईल.? अर्थातच काही इतिहासातील उदाहरणे आहेत आपल्याकडे की अशाही बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी ज्ञानार्जन केले आणि यशशिखरांवर विराजमान झाले . परंतु आपणास सर्व सामान्यांचा विचार करणे जास्त गरजेचे आहे . त्यामुळे समजा जर ३१ मे ला लॉक डाऊन संपला आणि परीक्षांच्या नव्याने तारखा जाहीर जरी झाल्या तरीही एकीकडे पालकांचा गेलेला रोजगार , नव्याने शोधावी लागणारी अर्थार्जनाची साधने , देणेकऱ्यांची देणी आणि या सर्वातून मन एकाग्र करून अभ्यास करणे सामान्य परिस्थितील विद्यार्थाना कसे शक्य आहे हा एक खूप मोठा प्रश्न आहे ?

५. सोशल डिस्टंसिंग पाळून परीक्षा कशा घेता येतील? तसेही या परीक्षा घेणे तशी काही अवघड बाब नाही परंतु मुद्दा काय आहे तर तो आहे संसर्गाचा ...

सर्व विद्यार्थी विविध भागांतून सार्वजनिक वाहतुकीची साधने वापरून महाविद्यालयात परीक्षेसाठी येणार , येताना त्यांचा किती लोकांशी संपर्क येणार ? समजा दुर्दैवाने एक निरोगी विद्यार्थी जर एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या नकळतपणे संपर्कात आला . महाविद्यालयात तो परीक्षेसाठी  आल्यावर किती विद्यार्थी आणि इतरांच्या संपर्कात येणार ? पुन्हा तो घरी जाताना आणखी किती लोकांच्या संपर्कात येणार ? हे मल्टिप्लेकशन नुसते समजून जरी घेतले तर परिस्थिती किती भयंकर असेल याचा अंदाज न केलेलाच बरा . आपल्याकडे निजामुद्दीन येथील तब्लिघी जमातीमुळे संपूर्ण देशभरात अतिशय वेगाने वाढलेल्या कोरोनाचे उदाहरण आहेच . अशा कोरोना विषाणूच्या कॅरिअर्स मार्फतच हा विषाणू खूप वेगाने पसरतो.

आता पुढील आक्षेपाचा विचार करूयात अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता जर त्यांना पदवी दिली तर बेकारांची फौज निर्माण होईल . तर त्यावर असे म्हणावे लागेल की हा संसर्ग केवळ भारतात नसून जागतिक आहे आणि निदान महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तर असे जाणवेल की मागील काही दिवसांत विविध विभागात कित्येक जागा रिक्त असल्याची बातमी होती त्या जागा भरणे बाबतीत कित्येक वर्ष आंदोलन करून ,निवेदने देऊनही कोणत्याच सरकारच्या कालावधीत भरती करण्यात आलेली नाही . आणि मेगा भरतीच्या नावाने काय आणि किती जागा भरल्या याचा तपशीलही आपण सर्वांना माहिती आहेच . तर बेकारी निर्माण होईल हा मुद्दा रास्त वाटणारा नाही .

७. आक्षेपांचा पुढील मुद्धा म्हणजे मेरीटमधील किंवा हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होईल तर यावर असे सांगावेसे वाटते की , गुणवत्ता ही मिळालेली डिग्री ठरवत नसते तर अंगीभूत कौशल्य ठरवीत असते . डिग्री म्हणजे केवळ एक परवाना आहे अंतिम कौशल्य तर त्या परवाना बाळगणार्याचेच असते . ते हुशार विद्यार्थी जिथे कुठे भविष्यात जातील तिथे ते आपल्या कर्तृत्वाचा ठसा नक्कीच उमटवतील.
८. आता शेवटचा असणारा आक्षेप म्हणजे विविध प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा देताना येणाऱ्या अडचणींबाबत . जसे टक्केवारीची अट . अशावेळी जसे आतापर्यंत भुकंम्पग्रस्त , पूरग्रस्त , सीमाभागातील नागरिक , यांना जसे सहज सामावून घेऊन परीक्षा देता येते तसेच या सर्व विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घ्यावे . परंतु हा सहभाग केवळ प्रवेश परीक्षा , पूर्व परीक्षा यांच्यासाठीच मर्यादित असावा ; विद्यार्थ्यांची अंतिम निवड ही  केवळ त्यांच्या परीक्षेतील कामगिरीवर आधारितच असावी तिथे कोणतेही सामावून घेण्याबाबत धोरण नसावे . आणि अशा वेळी जे विद्यार्थी खरोखर मनापासून गुणवत्ता सिद्ध करतील केवळ तेच टिकून राहतील आणि कोणावरही कसलाच अन्यायही होणार नाही.

इतरही बरेच आक्षेप असू शकतात परंतु आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीला तेव्हाही दोष दिला जात होताच आणि सध्याही ती आदर्श आहे असे कोणीही म्हणणार नाही परंतु सध्याची कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जी काही बिकट परिस्थिती आणि संकट आज आपणा  सर्वांसमोर उभे ठाकलेआहे त्याचा सामना आपण सर्वांना सामान्य जणांचा विचार करूनच अतिशय धैर्याने करायचा आहे . या लेखाच्या अनुषंगाने आतापर्यंत दुर्लक्षित झालेला ' कोविड १९ -विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि पालकांची आर्थिक स्थिती' यावर प्रकाश टाकणे हाच हेतू होता आणि या परिस्थितीमधूनही मार्ग मिळेलच हे ही नक्की !

शेवटी लेखाचा समारोप करताना सुचलेले एक वाक्य, " Hope for the best , but prepare for the worst ..!"





*****************

श्री  विक्रम अरने.

सहाय्यक प्राध्यापक – अर्थशास्त्र

हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालय

संपर्क : 9975252587

Email: vikramarne@gmail.com

Comments

  1. एक विद्यार्थी म्हणून मला हा लेख खूप महत्वाचा आणि आमच्या भाषेत सांगायचं झालं तर touching वाटतो..
    आजपर्यंत बातम्यांमध्ये, कोरोनाचा समाजाच्या इतर घटकांवर मग तो नोकरवर्ग असो, मजूर असो, स्थलांतरित असो, स्त्रिया असो यांवर पडलेला फरक आणि त्यांच्या व्यथा ऐकल्या आणि त्या रास्तही आहेत.
    पण या सगळ्याचा विध्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही तितकाच फरक पडतोय हे या लेखातून समोर आलं आणि ते खरं आहे. पालकांच्या चिंता, घरची डळमळलेली अर्थव्यवस्था आणि चारही बाजूंनी मानसिकतेवर होणारा परिणाम हा विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकतो आणि तो ठरतोय.
    या जागतिक संकटात नुकसान सगळ्यांचच झालं आहे, पण एका विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम हा दीर्घकालीन आणि धोकादायक ठरू शकतो. (असे विध्यार्थी जे आपण नमूद केल्याप्रमाणे संकुचित आणि प्रतिकूल वातावरणात राहत आहेत ).
    आणि गुणवंत विद्यार्थ्यांवरील आपले विचार हे तितकेच आशादायक आहेत (real stars knows about twinkling, degree doesnt decide his or her capability )
    पण त्यांच्या मनातले संभ्रम लवकरात लवकर दूर व्हायला हवेत, हीच इच्छा आहे.
    And the last quote is the best answer to this situation.
    As a student, i have to be prepare for all. 👍


    ReplyDelete
    Replies
    1. Yes , As last Said , Hope for the best ...!!

      Delete
  2. खूप छान विवेचन केले आहेत, सर

    ReplyDelete
  3. Sir it was really best, heart touching, and real condition.. Very beautifully written��

    ReplyDelete
  4. Just for the sake of all students and parents ...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चहा की कॉफी....?

कोरोना नंतर .....

After Corona ..... (English article)